नाशिक दिनकर गायकवाड लग्नाचे आमिष दाखवून ४ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली.याप्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कल्पनाबाई संतोष तिरमली (रा. गोपाळपूर, ता. दोंडाईचा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,संशयित यशोदा ऊर्फ केशरबाई किसन पवार, जालीराम किसन पवार, कार्तिकी अंबादास महिरे यांच्यासह सहा जणांनी संगनमत करून ही फसवणूक केली. सदर घटना २८ फेब्रुवारी २०२५ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत वेरूळे व नांदुरीगड पायथा येथे घडली. फिर्यादी यांचा मुलगा सागर संतोष तिरमली याचे लग्न संशयितांच्या सांगण्यावरून कार्तिकी महिरे हिच्याशी लावण्यात
आले.
फिर्यादीकडून ४ लाख ६० हजार रुपये रोख आणि सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अशी एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांची रक्कम संशयितांनी स्वीकारली. विवाहानंतर जेवणासाठी थांबले असताना
वधू कार्तिकी महिरे ही पतीचा मोबाईल घेऊन माहेरी निघून गेली त्यानंतर फिर्यादीने तिला परत पाठवण्याचे वारंवार विनवले असता संशयित यशोदा पवार हिने आता तुमचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते, पण पुन्हा
एक लाख ५० हजार आणा, असे म्हणत पुन्हा पैसे मागितले. या संपूर्ण प्रकारात फिर्यादीकडून खोटे लग्न लावून आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित यशोदा ऊर्फ केशरबाई किसन पवार, जालीराम किसन पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एम.गायकवाड तपास करत आहेत.