नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फ त असलेल्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी भविष्य निर्वाह भत्ता,शैक्षणिक साहित्य खरेदी,आहार भत्त्यामध्ये महागाईच्या वाढीनुसार दुप्पट वाढ व्हावी या मागणीचा विचार करून शासनाने मंजुरीचा निर्णय दिला.अनेक दिवसांपासून या मागणीचा पाठपुरावा करत असलेले आमदार हिरामण खोसकर यांच्यासह विविध सामाजिक संघटना तसेच विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नाला अखेर यश प्राप्त झाले.
आ.खोसकर यांच्याकडे मतदारसंघासह अनेक जिल्ह्यातील सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनेने यापूर्वी मागणी केली होती. त्याचाच पाठपुरावा आ. खोसकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदिवासी विकासमंत्री उईके यांचासह आदिवासी आयुक्त यांच्याकडे केला होता.
इगतपुरी स्थित कार्यक्रमामध्ये आदिवासी विकासमंत्री उईके यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या दशा फोटो व व्हिडिओद्वारे थेट दाखवून व्यथा मांडली होती.
अखेर या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केल्यामुळे आ.खोसकर, सामाजिक संघटना यांच्यासह विद्यार्थी संकटनांना यश मिळाले. थेट लाभ हस्तांतर योजनेच्या दुपटीने वाढ झाल्याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यासह अनेक जिल्ह्यांतील सामाजिक संघटना व विविध विद्यार्थी संघटनेसह आमदार हिरामण खोसकर यांनी आभार मानले.