पुलास संरक्षक कठडे न बसविल्यास खेडगाव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील ककाणे-खेडगाव येथील पुनद नदीवर बांधलेल्या पुलावर दुतर्फा संरक्षक कठडा बसवावा,अन्यथा खेडगाव,ककाणे,विसापूर, बिजोरे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय मुद्रा जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप वाघ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
खेडगाव-ककाणे या गावास जोडणाऱ्या रस्त्यावर जवळच पुलाच्या दोन्ही बाजूला आदिवासी वस्तीनजीक पुनद नदीवर कमी उंचीचा ठेंगणा व दुतर्फा कठडा नसलेला पूल बांधला आहे. या पुलामुळे खेडगाव, ककाणे, बिजोरे, खामखेडामार्गे सटाणा व कळवण येथे येण्या-जाण्यासाठी हा एकमेव रस्ता सोयीस्कर असल्याने या पुलावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

परिसरातील शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर व इतर दोन वाहने पुलावरून आमने सामने आल्यावर विपरीत दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. नदीकाठाच्या जवळच वस्ती असल्याने लहान मुले येथे पूरपाणी बघायच्या हौसेने पुलावर येत-जात असतात. पावसाळ्यात पूरपाणी आल्यावर कमी उंचीच्या या पुलावरून कंबर, छातीइतके पाणी वाहत असल्याने अनेकदा वाहनधारकांना मोकभणगीमार्गे जावे लागत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. नदीचे खोलीकरण व वर्षानुवर्षे पावसाळ्यात रुंदीकरण झाल्यामुळे पुलाजवळील नदीपात्रात जागोजागी खड्डे पडले आहेत. या पुलावरून जाताना दुचाकीवरून पुलाखाली नदीपात्रात पडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या बाजूंना दुतर्फा संरक्षक कठडे बसवलेले नाहीत.पुलाच्या दोन्ही बाजूंकडून तीव्र उतार असल्याने वाहन खाली पडल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. गावाच्या वस्तीजवळील शाळकरी मुले येताना जाताना पुलाच्या कडेने चालतात.

त्यांचाही तोल जाऊ शकतो. याबाबत स्थानिक ग्रामस्थाच्या मागणीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वी पुलावरील खड्डे बुजवून सहा इंचचा स्लॅब ओतून दुरुस्ती केली, मात्र यावेळी दुतर्फा कठडा बसवण्याची साधी तसदीही घेतली गेली नाही.

 त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली खरी, त्यामुळे 'जखम मांडीला आणि मलम शेंडीला' हे कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत वापरली जाणारी लोकोक्ती वास्तवात दिसत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन खेडगाव-ककाणे येथील पुलावर दुतर्फा संरक्षक कठडे बसवावे, अन्यथा खेडगाव, ककाणे, बिजोरे, विसापूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!