नाशिक दिनकर गायकवाड कळवण येथील जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने कोंडवाडा उभारण्यात यावा व सबंधीत कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे व मुख्याधिकारी नागेश येवले यांना कळवण तालुका भाजपकडून देण्यात आले.
कळवणमध्ये मोकाट जनावरे गायी, म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी गायींच्या हल्यात भालचंद्र रघुनाथ मालपुरे, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आबा मोरे हे जखमी झाले आहे. यापूर्वी ही गणेशनगरमध्ये पावसाळी अंधारात रस्त्यावर जनावरे न दिसल्याने प्रवासी रिक्षाचा अपघात झाला होता.
शहरातील चौक, मुख्य रस्ते, मर्चट बँक परिसर, आठवडे बाजारातही अनेक वयोवृद्ध महिला, पुरुष आणि वाहनधारकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहे. कळवण शहरात मोकाट जनावरांना तात्काळ कोंडण्यासाठी कोंडवाडा उभारण्यात यावा, मृत्यू झालेल्या भालचंद्र रघुनाथ मालपुरे, जखमी झालेले आबा मोरे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, डॉ. अनिल महाजन, शहराध्यक्ष निंबा पगार, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, दीपक वेढणे, हेमंत रावले, संदीप अमृतकार,चेतन निकम आदींनी केली आहे.
