नाशिक दिनकर गायकवाड- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यातील देवळा तालुका येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. या यशाबद्दल शाळेला रोख तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. या शाळेची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
या उपक्रमात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी एकत्रितपणे मेहनत घेतली, स्वच्छता, शाळेचे सौंदर्याकरण, भिंतींची रंगसजावट, शैक्षणिक गुणवत्ता आदी बाबींमध्ये शाळेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या यशामध्ये गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, शिक्षणविस्तार अधिकारी किरण विसावे, केंद्रप्रमुख आहेर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या उपक्रमाला दिशा दिली.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, उपाध्यक्षा सुशीला आहेर, सचिव प्रा. डॉ.मालती आहेर, प्रशासक बी. के. रौंदळ, स्कूल कमिटी सदस्य तथा पालक संघ यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. राज्य
शासनाने "मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियान राबविले या अभियानात ग्रामीण भागातील शाळांनी सहभाग घेतला.
देवळा येथील श्री शिवाजी मराठा स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता व सौंदर्याकरण, शिस्त आदी बाबींमुळे पालकांचे लक्ष वेधून आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाळादेखील या माध्यमातून उच्च पातळीवर पोहोचू शकतात, हा जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी आदर्श असल्याचे सांगण्यात आले.
