नाशिक दिनकर गायकवाड नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे पाकीट लांबविणाऱ्या दोन चोरट्यास रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासांत जेरबंद करीत मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद विश्राम मांजरेकर (रा. नवी मुंबई) नाशिक ते मुंबई असा प्रवास करण्या करिता कामयानी एक्सप्रेसच्या मागील जनरल डब्यात रेल्वे स्टेशन नाशिक रोड प्लॅटफॉर्म नंबर तीनवर मागील डब्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या मागील खिशात ठेवलेले एक राखाडी रंगाचे पाकीट,त्यातील रोख रक्कम १४ हजार रुपये, पॅन कार्ड, डिझेल बिल,ड्रायव्हिंग लायसन्स असा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करताच प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांनी पोलिसांचे तपास पथक तयार करून त्यांना तपास करण्याबाबत सांगितले. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे मनीष कुमार यांना मदतीस घेऊन
नाशिकरोड रेल्वे स्टेशन हद्दीत शोध घेतला असता गुन्हा माहिती देणाऱ्या खबऱ्यांकडून हनुमान मंदिराजवळ दोन जण भांडत असल्याचे सांगितले. ते तत्काळ तेथे दाखल होत त्यांना नाव विचारले असता,आमिन यासीन शेख (वय ३४, रा. सील गमीन कॉलनी, सवेरा हॉटेल समोर. छत्रपती संभाजीनगर), शेख झाकीर उद्दीन शेख जाहीर-उद्दीन (वय ४२, रा. इंदिरानगर, न्यू बाहिजापुरा, गल्ली नंबर १ संभाजीनगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक राखाडी रंगाचे पाकीट मिळाले.त्यात प्रमोद मांजरेकर यांच नावाचे पॅन कार्ड दिसले व त्यात रोख रक्कम १२ हजार रूपये व इतर कागदपत्रे मिळाली. त्यांना उर्वरित रक्कम विचारली असता मद्यपान व
जेवणासाठी खर्च केल्याचे सांगून गुन्हा कबूल केला. पोलीस उपनिरीक्षक संजय केदारी यांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. ही कामगिरी विभागीय अधिकारी स्वाती भोर, संजय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंग,उपनिरीक्षक संजय केदारे, हवालदार शैलेंद्र पाटील,संदीप उगले,राज बच्छाव,रघुनाथ सानप, कॉन्स्टेबल सुभाष काळे, विशाल पांडे व सत्य सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रतापसिंह, उपनिरीक्षक संजय केदारे, हवालदार शैलेंद्र पाटील, संदीप उगले, राज बच्छाव, रघुनाथ सानप, कॉन्स्टेबल सुभाष काळे, विशाल पांडे व रेल्वे सुरक्षा बलाचे मनीष कुमार यांनी केली.
