कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जि. प. च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी फिर्याद दिली आहे.त्यात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या (इमारती वदळवळण) विभाग क्रमांक ३ च्या तत्कालीन कार्यकारी अभियंता आरोपी शैलजा नलावडे यांनी इतर इसमांच्या संगनमताने शासन निर्णय क्रमांक टीडीएस २०२४/६/प्र. क्र. १२०/पर्यटन-१ दि. ६ ऑगस्ट २०२४ हा बनावट तयार केला.
त्याद्वारे एक कोटी रुपयांची पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून हा बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय लेखा अहवाल नोंदविला.
खोटे दस्तऐवज तयार करून निविदा भरणाऱ्या इसमांना शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा गैर लाभ व्हावा, या उद्देशाने इतर शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार दि. ४ डिसेंबर २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळण विभाग क्रमांक ३ च्या कार्यालयात घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे व इतरांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.
