नाशिक दिनकर गायकवाड -दरोडा टाकण्यासाठी एकत्र येऊन लोखंडी कोयता, कटावणी, मिरची पूड आदी साहित्य बाळगणान्या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित किरण अशोक खंबाईत ऊर्फ हुक्का (वय २५, रा. शिवाजीवाडी, भारतनगर), वसिम अब्दुल रहमान शेख (वय २८, रा. नंदिनीनगर, भारतनगर), विष्णू किशन पवार (वय ३०, रा. शिवाजीवाडी, नाशिक) व नवाज इरफान शहा (वय २२, रा. म्हाडा वसाहत,भारतनगर) हे चौघे जण भारतनगर झोपडपट्टीच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात असलेल्या प्लॉटच्या कंपाऊंडच्या भिंतीलगत एकत्र आले. हे सर्व जण संगनमत करून दरोडा घालण्याची पूर्वतयारी करीत होते.
यावेळी पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत किरण खंबाईत याच्याकडे लाकडी मूठ असलेला लोखंडी कोयता मिळून आला, तर
विष्णू पवार याच्याकडे लोखंडी कटावणी मिळून आली. लाकडी पाती वसिम रहमान शेखकाई मिळून आले. त्याचप्रमाणे चौथा आरोपी नवाज इरफान शहा याच्याकडे लाल रंगाची मिरची पूड मिळून आली. हे सर्व जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
