नाशिक दिनकर गायकवाड वाईन शॉपवर दगडफेक केल्यामुळे इमारतीसह दुकानाला शॉर्ट-सर्किटमुळे आग लागली. यात दुकानमालकासह इमारतीतील नागरिकांना धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांना - पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमित किशोर ठाकरे (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) यांचे गंगापूर रोडवर जेहान सिग्नलजवळ द मदिरा वाईन -शॉप नावाचे दारूचे दुकान आहे. काल आरोपी शिवाजी ऊर्फ बाळा पोपट गांगुर्डे (वय २८, रा.
सावरकरनगर, गंगापूर रोड, मूळ रा. रवळगाव, ता. दिंडोरी) व राजू हणमंता माळी (रा. बांदशी) यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या वाईन शॉपवर दगडफेक करून ६० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच या दगडफेकी मुळे दुकानासह इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करून व दुकानातील मालाचे नुकसान केले. यापूवी देखील या दोघा आरोपींनी ठाकरे यांच्या दुकानात जबरदस्तीने घुसून ठाकरे यांच्यासह दुकानातील कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात ४० हजार रुपये घेऊन गेले आहेत.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शिवाजी गांगुर्डे व राजू माळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
