गडचिरोली सिटीलाईन न्यूज नेटवर्क माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमावर ठेवून गडचिरोलीत विकास कामे करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत केले.
बैठकीस सहपालकमंत्री आशिष जयस्वाल,अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, सीसीएफ जितेंद्र रामगावकर, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत असून, ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विशेषतः मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दक्षतेने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये पुरेसे अन्नधान्य, औषधांचा साठा आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या उपाययोजनांची तपासणी करावी. संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी करावयाच्या कायमस्वरूपी उपयोजनाअंतर्गत मंजूर ५ टप्प्यांपैकी किमान २ टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
