श्री साईबाबा संस्थानला तेलंगणा व आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून पाच शिल्पांची देणगी

Cityline Media
0
शिर्डी दिपक कदम देश-विदेशातील लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री. साईबाबा संस्थानला काल एक अनोखी भेट प्राप्त झाली. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील पाच साईभक्त कुटुंबांनी आपली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी पाच शिल्प श्री साईबाबा संस्थानला दान दिली. या शिल्पांचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से.) आणि संबंधित देणगीदार साईभक्तांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, सहाय्यक अभियंता स्वप्निल गायकवाड, तांत्रिक विभागप्रमुख अतुल वाघ, श्री साईप्रसाद निवासस्थान विभागप्रमुख प्रविण मिरजकर यासह संस्थानचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचही शिल्पे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थानच्या विविध ठिकाणी ही शिल्‍पे बसविण्यात आली आहेत. हैद्राबाद, तेलंगाणा येथील श्री के. मोहन रेड्डी आणि श्रीमती के. श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प व सिकंदराबाद, तेलंगाणा येथील श्री प्रकाश चन्नावर व श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्‍यात आले. कोरुतला व्हिलेज, तेलंगाणा येथील श्री ए. वेणुगोपाल व श्रीमती ए. शोभा यांचे दगडावर बसून आशिर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथील श्री जी. श्रीनिवास व श्रीमती जी. श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्त निवासात ठेवले गेले. तर, हैद्राबाद, तेलंगाणा येथील श्रीमती ए. माया व श्री ए. बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठापित झाले.
या प्रसंगी साईभक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता यांचा उत्तम समन्वय दिसून आला. श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!