नाशिक दिनकर गायकवाड मेडिकल डिस्ट्रिब्युटरला
बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडून ५० हजार रुपये रोख स्वरूपात स्विकारून आणखी १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कपिल रमेश अरोरा (रा. गणेशबाबानगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक) हे मेडिकल डिस्ट्रिब्युटर आहेत.अरोरा यांना नाशिक जिल्हा शासकीय रुगणालयाचा ठेका मिळाला होता.
त्या ठेक्याबाबत आरोपी पुखराज माणिकचंद जैन व त्यांचा मुलगा नीलराज पुखराज जैन यांनी अरोरा यांच्याकडून बळजबरीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवून त्यांना बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यापोटी जैन पितापुत्राने अरोरा यांच्याकडून गणेश बाबानगर येथील सिद्धमुनी शॉप नंबर २६३ येथे येऊन ५० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले,पैसे स्वीकारूनही जैन पितापुत्राने अरोरा यांना त्रास देणे सुरूच ठेवले होते. हा सर्व प्रकार जानेवारी २०२५ पासून सुरू होता.
काल पुन्हा जैन पितापुत्र अरोरा यांच्याकडे गेले होते. तुम्ही आम्हाला १५ लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या विरुद्ध विविध वृत्तपत्रांत व वृत्तवाहिन्यांवर बातम्या प्रसारित करतो,असा दम भरला. या प्रकरणी कपिल अरोरा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पुखराज जैन व नीलराज जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नीलराज जैनला नुकतीच अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
