ठाणे शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी

Cityline Media
0


 नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

 ठाणे (विशाल सावंत-- पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.
अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी  पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावीत जेणेकरुन पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

या पाहणीदौ-यास अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे, शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

यावेळी विटावा सबवे, पेढया मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी,भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त श्री. राव  यांनी केली. विटावा सबवे येथे ४० एचपीचे पंप बसविण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी केले या ठिकाणी  २४ तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

पेढया मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी पंप बसविण्यात आले असून  क्रॉस कलव्हर्टची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी २४ तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

वंदना एस.टी डेपो  हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी आयुक्तांनी केली. ‍ अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क रहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. राव यांनी  यावेळी दिल्या.

पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. महापालिका हद्दीतील ३०० कि.मी नाल्याची सफाई करण्यात आलेली आहे. मशीनच्या साह्याने ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेने हाती घेतला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ३४ सखल भाग असून त्यापैकी १४ सखल भागात थोड्याशा पावसात पाणी साचते यासाठी एकूण ६४ पंपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव  यांनी दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!