नाशिक दिनकर गायकवाड- नाशिक जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी काढले आहेत. यामध्ये पाच पोलीस निरीक्षकांना कोणतीही नियुक्ती दिली नसून मात्र त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नाशिक पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये सातत्याने दौरे करून माहिती घेणाऱ्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रात्री उशिरा जिल्ह्यातील काही पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सर्व बदल्या करण्यात आलेले अधिकारी हे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून एक प्रकारे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील पोलीस दलाची भाकरी फिरवली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पोलिस खात्याच्या बदल्यांमध्ये सारिका अहिरराव यांची नियुक्त इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तर सुधीर पाटील यांची बदली मालेगावच्या किल्ला पोलीस ठाण्यात, राहुल खताळे यांची बदली मालेगावच्या पवारवाडी, मृदुला नाईक यांची बदली नाशिक तालुका पोलीस ठाण्यात, विजय शिंदे यांची बदली घोटी पोलीस ठाण्यात व महेश कुलकर्णी यांची बदली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
जिल्ह्यामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पुरुषोत्तम शिरसाठ यांची बदली वडनेर खानुजी येथे करण्यात आली आहे. तर दगडू पाटील यांची बदली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गायत्री जाधव यांची बदली वणी पोलीस ठाणे, राकेश परदेशी यांची बदली अभोणा पोलीस ठाण्यात व सिद्धेश्वर आखेगावकर यांची बदली वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
