हुंडा नाही,दिखावा नाही…फक्त आत्मिक भक्ती आणि समर्पणात पार पडला अनोखा विवाह
खंडाळा (दिपक कदम):श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि पवित्र सेवेच्या साक्षीने श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळाच्या पिंपळाचा वाडा येथील श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्रात नुकताच एक अनोखा आणि आगळावेगळा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळाचा वाडा,खंडाळा येथे गेल्या सात वर्षांपासून प्रश्न उत्तर विभाग आणि विवाह संदर्भ सेवा प्रत्येक रविवारी नियमित सुरू आहे.याच सेवेच्या माध्यमातून यवतमाळ येथील कुमारी अनुपमा गाडेकर आणि राहता तालुक्यातील वाकडी गावचे दिनेश कोहकडे यांची ओळख झाली.
दोघेही विवाह संदर्भातील मार्गदर्शनासाठी सेवा केंद्रात उपस्थित होते.विशेष म्हणजे,या ठिकाणी दोघांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ सुचविण्यात आले.दोन्ही परिवारांनी मनापासून या स्थळाला पसंती दिली आणि अवघ्या काही दिवसांतच विवाहाची तयारी झाली.
नुकतेच,येथे केंद्राच्या जागेतच कुठलाही दिखावा किंवा हुंड्याचा व्यवहार न करता,अत्यंत साध्या,पण मंगलमय वातावरणात दोघांचा विवाह पार पडला झाला.या विवाह सोहळ्यासाठी दिंडोरी दरबाराच्या याग्निकी विभागाचे शास्त्री बाळकृष्ण पांगरकर यांच्या मंत्रोच्चाराने विधी पार पडले.
तसेच,युवा भागवत कथाकार बाबा महाराज खंडाळकर यांनी विवाह संस्कारांचे महत्व आणि यामागील अध्यात्मिक अर्थ स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.या सोहळ्यात केवळ सेवेकरी आणि मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती होती, त्यामुळे विवाहाला एक वेगळाच आध्यात्मिक आणि पवित्र साज चढला होता.
परंपरागत विधी, संतांच्या आशीर्वादाने आणि नात्यांच्या सामंजस्याने पार पडलेला हा विवाह आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.हा विवाह सोहळा हेच सिद्ध करतो की, विवाह हे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबांचे पवित्र बंधन असून, ते सेवेच्या ठिकाणी अधिक दृढ होते.