दौंड प्रतिनिधी पंढरपूरला वारीसाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर गळ्याला कोयता लावून सामुहिक अत्याचार महाराष्ट्राला लाज आणणारी घटना सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी अत्याचार केला आहे.त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले आहेत. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) इथं ३० जून रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. आषाढी वारीसाठी महामार्गाने पंढरपूरकडे चारचाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबले होतं. तेव्हा दुचाकीवरून दोन तरूण तिथं आले. त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचं डोरलं, कर्णफुले व मंगळसूत्र अमानुषपणे ओरबाडून काढलं.
त्यानंतर कुटुंबीयांसह असलेल्या अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरीच्या मागे असलेल्या नाल्याकडं नेण्यात आलं तिथं शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकारानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरुन गेलेलं आहे. आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असतानाही हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरूध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पॉक्सो व बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटना स्थळी भेट दिली