ओला दुष्काळ' जाहीर करा गावित
नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यात दोन महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत.खरीपाची शेती पुर्ण पणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच केंद्र सरकारची कामगार, शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा, असे प्रतिपादन माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शनप्रसंगी गावित बोलत होते.
यावेळी उंबरठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मा.आमदार जे.पी. गावित म्हणाले की,केंद्र सरकारने कामगार श्रमसंहिता विरोधी
केलेले चार कायदे हे अन्यायकारक आहेत. केंद्र सरकारने गोंडस नावाने केलेला 'जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे.
सर्व सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर गुन्हे दाखल होतील अशी कलमे यामध्ये आहेत. सरकार विरोधी बोलणे, सभा घेण्याचे स्वातंत्य या कायद्यान्वये हिरावून घेतले आहे. जनसुरक्षा विधेयक व चार श्रमसंहिता हे अन्यायकारक कायदे आहेत या कायद्याला विरोध म्हणून संपात सहभाग नोंदवला आहे.
सह्यांची मोहीम राबवली आहे. प्रत्येक गावातून सही पंतप्रधान यांना पाठवली जाणार आहे.यामुळे भाजपचा चेहरा खरा चेहरा उघड करणारा हा संप आहे.अशी टीका त्यांनी केली. या संपात कृषी विभाग, पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, एकात्मिक बाल विकास योजना, कळवण प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास योजना या बाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती संपकऱ्यांना दिली.
संपात शेकडो शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका, पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी तहसिलदार रामजी राठोड यांच्यासह तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सुभाष चौधरी, जनार्दन भोये, भिका राठोड, उत्तम कडू, विजय घांगळे, चंद्रकांत वाघेरे, भास्कर जाधव, संजय पवार, सुभाष भोये, भरत पवार, शाम पवार, अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावित, परशुराम गावित, आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गवळी, मंजुळा धुम यांच्यासह कामगार, शेतकरी उपस्थित होते.