संगमनेर प्रतिनिधी महाराष्ट्राचे तत्कालीन कृषीप्रेमी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून, जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गेल्या ९ वर्षांपासून 'युवा शेतकरी सन्मान सोहळा' आयोजित केला जात आहे.
स्व. वसंतराव नाईकांनी हरित क्रांतीच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या शेती व शेतकऱ्यांसाठीच्या विचारांची प्रेरणा घेऊन,व मा.केंद्रीय मंत्री डॉ.अण्णासाहेब शिंदे आणि थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या आशीर्वादाने हा सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. तसेच दरवर्षी हा सोहळा अधिक व्यापक आणि प्रभावी ठरत असून, प्रत्येक वर्षी यशाचं नवीन शिखर गाठत आहे.
देशाचं अर्थकारण, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण विकासाचा खरा पाया शेतीमध्ये असून त्याची जबाबदारी आपल्या बळीराजाच्या खांद्यावर आहे. बदलत्या काळानुसार शेतीने पारंपरिक कात टाकली असून ती व्यावसायिक बनली आहे. त्यामुळे नफा-तोट्याचं व्यवस्थापन ही काळाची गरज आहे.आज अनेक युवा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्प शेत जमिनीमधूनही मोठा नफा मिळवत आहेत. त्यांचे कौतुक करून नव्या पिढीला प्रेरणा देणे, हाच या सोहळ्याचा उद्देश आहे.
या सोहळ्याला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ऑनलाईन उपस्थिती लाभली. तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, 'जयहिंद चळवळ'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे व खासदार शोभा बच्छाव आमदार सत्यजित तांबे यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
