राहाता प्रतिनिधी तालुक्यातील बाभळेश्वर येथील बाळ येशू चर्च, व भोसले प्रतिष्ठान, संगमनेर कोंची, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बाळ येशू चर्च मध्ये १६२ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे सामूहिक उदघाटन सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रश्न मंजुषा चर्चा सत्रात रेव्ह. फादर मायकल वाघमारे म्हणाले कि, विवाह हा नुसता सोहळा नसून तो एक पवित्र संस्कार आहे, परमेश्वराच्या उपस्थितीत घेतलेली शपथ एका बंधनाने कायमचं अध्यात्मिक नातं निर्माण करते. "वाण नको पण गुण हवा" असे संबोधुन रेव्ह. फादर संजय पंडित म्हणाले कि, सौंदर्य क्षणभंगूर असून आई वडिलांनी मुलींवर केलेले संस्कार अजिवन साथ देतात.
यावेळी सुवार्तिक पा.पौलस पराड यांनी उपस्थित मुला मुलींसाठी प्रार्थना पूर्वक सांगितले कि, नवविवाहितांनी कुटुंबामध्ये निस्वार्थी प्रेमाचा वारसा कायम टिकवला पाहिजे. युवा प्रिचर प्रतिम राजेश्वर पारखे म्हणाले कि, येशूने जसे ख्रिस्ती मंडळीला आपल्या पवित्र हृदयात घेतले तसे पती-पत्नीनेही एकमेकांना आपल्या हृदयात सामावून घेतले पाहिजे.
मार्गदर्शन करताना ॲड. कल्याणी बनसोडे यांनी यावेळी शासकीय रजिस्टर विवाह(कोर्ट मॅरेज) पद्धतीचे फायदे विषद करून सांगताना म्हणाल्या कि, लग्नात होणारा आनावश्यक खर्च विचारपूर्वक टाळावा. योग प्रशिक्षक सुरेश भिंगारदिवे म्हणाले कि, वधू-वर मेळावा हे केवळ विवाहाचेच नाही तर ख्रिस्ती समाज संघटनेचे एक उत्तम माध्यम आहे.
ग्रामीण भागासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यात संभाजीनगर, मनमाड, नाशिक, मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर जिल्याच्या ग्रामीण भागातून १३५ हुन अधिक विवाह इच्छुक व पालक उपस्थित होते.
