मविप्रचे रामराज्य नावाने बोगस फेसबुकवर बदनामी
नाशिक दिनकर गायकवाड विविध खरेदी व बांधकामाचे टेंडर न दिल्यास संस्थेसह पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी भास्कर सुखदेव ढोके (रा. खुटवडनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सुदर्शन दिलीप सारडा या व्यक्तीने अथवा त्याने सांगितलेल्या व्यक्तीला मराठा विद्या प्रसारक शैक्षणिक संस्थेची विविध खरेदी व बांधकामाचे टेंडर न दिल्यास संस्थेसह पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची
धमकी दिली. तसेच आरोपीला टेंडर दिले नाही म्हणून त्याने संस्थेचे नामसाधर्म्य असलेले 'मविप्रचे रामराज्य' या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करुन त्यावर फिर्यादी ढोके यांच्यासह मविप्र संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व संस्थेची बदनामी केली. तसेच यापुढे टेंडर न दिल्यास दरवर्षी ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी सुदर्शन सारडा यांनी केली.
जुन अखेरपर्यंत त्यांच्या मागणीची पुर्तता न केल्यास त्यांच्याकडे असलेल्या संस्थेच्या कागदपत्रांचा वापर करून संस्थेचे आर्थिक नुकसान करण्याची व फिर्यादी ढोके यांच्या हातपाय तोडून संस्थेत फिरू न देण्याची धमकी दिली. हा प्रकार मार्च २०२३ ते २ जुलै २०२५ या कालावधीत मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात घडला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन सारडा याच्याविरुद्ध खंडणीसह धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहे.
