नाशिक दिनकर गायकवाड चॉपरने वार करून २५ वर्षीय युवकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिंडोरी रोड परिसरात घडली.
याबाबत पप्पू सोनू पवार (वय २५, रा. गाँडवाडी, फुलेनगर, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पवार हे मजुरी काम करून घरी पायी जात होते. त्यावेळी दिंडोरी रोडवरील एका भंगार दुकानाजवळ ते आले असता त्यांच्याच ओळखीचा विकी संजय जाधव (वय २१, रा. अवधूतवाडी, पंचवटी) हा त्यांच्यासमोर अचानक आला आणि वाईटसाईट शिवीगाळ करून लागला. "आता तुला
मारूनच टाकतो," असे म्हणून स्वतःच्या खिशातून धारदार चॉपर काढून त्याने पप्पू पवार यांच्या मानेवर फिरविला असता पवार यांनी हात पुढे केल्याने त्यांच्या मनगटाजवळ हा वार लागला. विकीने पुन्हा पप्पू यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला असता तो वार चुकविण्याच्या नादात पप्पू यांच्या काखेखाली वार लागल्याने तेथे गंभीर दुखापत झाली.
पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात विकी जाधवविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न के ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी विकी जाधवला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
