नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेच्या वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे दि. २ व ३ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.
हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंगजी साहित्य नगरी, भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, नांदेड येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आली असून, स्वागताध्यक्षपदी राज्यसभेचे खा. डॉ.अजित गोपछडे हे असणार आहेत.
संमेलनाध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक असून 'राघववेळ' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आहेत. संमेलनाचे निमंत्रक म्हणून शिवा कांबळे, तर सहनिमंत्रक डॉ. माया गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो (अध्यक्ष, ऑल इंडिया भिक्खू महासंघ) यांच्या हस्ते होणार आहे.
समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून किशोर मकवाना, (अध्यक्ष, केंद्रीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग) हे उपस्थित राहणार आहेत.
नाशिक शहरातून समरसतेच्या प्रवाहात काम करणारे कार्यकर्ते, साहित्यिक आणि कवी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी राजाभाऊ गायकवाड, डॉ. भास्कर म्हरसाळे, डॉ. गजानन होडे, प्रा. नीलेश खैरनार, प्रा. वसंत पैठणकर प्रयत्नशील आहेत.
नियोजित संमेलनाध्यक्षांचा नाशिकला सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती समरसता साहित्य परिषद नाशिकचे समन्वयक नाना बच्छाव व संयोजकांतर्फे देण्यात आली.