संगमनेर प्रतिनिधी- गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून तालुक्यातील जोर्वे येथील समता विद्या मंदिर व शिल्पवेत्ता मधुकरराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय, येथे सेवानिवृत्त गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला.
गुरु ही संकल्पना फक्त अध्यापनापुरती मर्यादित नसून, ती आयुष्य घडवणारी असते. हीच भावना जोपासत, गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी समता विद्या मंदिर आणि शिल्पवेत्ता मधुकरराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय,जोर्वे येथे सेवानिवृत्त गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा अत्यंत भक्तिभावाने सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या जीवनावर आधारित अमृतमंथन व अमृत गाथा हे गौरव ग्रंथ देऊन झाला.
या विशेष प्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात,विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोखरकर ,तसेच अनेक माजी व विद्यमान शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी वृक्षारोपण देखील करण्यात आले.
विद्यालयात २५, ३०, वर्षांहून अधिक काळ समर्पणाने ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करताना, त्यांच्या योगदानाची आठवण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली. अनेक शिक्षकांच्या प्रयत्नामुळे जोर्वे गावातील विद्यार्थी आज शिक्षण, समाजसेवा,अध्यात्म,प्रशासन व राजकारणाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरले आहेत.
हा सन्मान सोहळा एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावातील युवकांनी एकत्र येत अत्यंत नियोजनपूर्वक साकार केला. गुरुजनांच्या सेवेला मान्यता देण्याचा हा संकल्प वास्तवात उतरवताना अनेकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
या सोहळ्याने फक्त सन्मान दिला नाही, तर पुन्हा एकदा विद्यार्थी-गुरु यांच्यातील नात्याची नवी नाळ जोडली.शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि प्रत्येकाच्या मनात शाळेप्रती, गुरुजनांप्रती आदरभाव अधिक गहिरा झाला.
गावात, परिसरात या सोहळ्याचे विशेष कौतुक करण्यात येत असून,हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.