इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया विभागाची जबाबदारी स्वीकारली; पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्धार
आश्वी संजय गायकवाड पुणे येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सचिन विठ्ठल उपाध्ये यांची एकमताने प्रदेश उपाध्यक्ष (इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया विभाग) म्हणून निवड करण्यात आली. संघटनेच्या या बैठकीत इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
सचिन उपाध्ये हे ‘दैनिक कॉमन न्यूज’चे ब्युरो चीफ आणि ‘निर्भीड जनता न्यूज’चे संपादक असून, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व सामाजिक पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांनी शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरीब घटकांच्या समस्या सातत्याने मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नवीन पदभार स्वीकारताना उपाध्ये म्हणाले, “पत्रकारांचे हक्क, संरक्षण आणि सन्मानासाठी मी कार्यरत राहीन. पत्रकारांचे रक्षण म्हणजे लोकशाहीचे रक्षण आहे.” त्यांनी इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्यासाठी व्यासपीठ उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संस्थापक अध्यक्ष डॉ. रामनाथ जऱ्हाड,उपाध्यक्ष राजेंद्र बनकर, प्रदेशाध्यक्ष नारायण ढेबे, सरचिटणीस गणेश खेमनर आणि सचिव अर्जुन अरगडे यांनी उपाध्ये यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्याकडून संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सचिन उपाध्ये हे यापूर्वी पत्रकार सेवा संघाच्या संस्थापक कमिटीचे खजिनदार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वावर संघटनेचा व पत्रकार बांधवांचा विश्वास असल्याने दुसऱ्यांदा नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड म्हणजे संघटनेच्या विश्वासाची पावती असून, या नेमणुकीमुळे पत्रकार सेवा संघ अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि संघर्षशील कार्यपद्धतीकडे वाटचाल करेल, असा विश्वास राज्यभरातील पत्रकारांनी व्यक्त केला आहे.