नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभाग घेत कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहासमोर मांडल्या.त्यांनी पंतप्रधानासह सर्व मंत्र्यांचे लक्ष वेधुन घेतले होते.
नाशिक जिल्ह्यात देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या सुमारे १०% कांद्याचे उत्पादन होते. यावर्षी कांद्याचे उत्पादन सरासरीपेक्षा अधिक झाले होते. मात्र, मे महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षे आणि इतर अनेक पिकांचे मोठ्या
प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे बाजारात कांद्याला योग्य दर मिळत नाहीये.
सध्या कांद्याचे बाजारभाव फक्त ७०० ते ८०० रुपये क्विंटल आहेत ज्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भागात नाहीत. त्यामुळे सरकारने कांद्याला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. याचबरोबर, नाफेड आणि एन सीसीएफ या संस्थांमार्फत होणारी कांद्याची खरेदी थेट बाजार समित्यांमधून करावी तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगांची स्थापना करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल आणि त्यांना योग्य मूल्य मिळेल,अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.