पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क शहरातील गंज पेठ येथील फुले दांपत्याचे निवासस्थान असलेले "फुले वाडा" आणि त्या जवळच असलेल्या सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणा बाबत नुकतीच मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीस अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडण्याची गरज व्यक्त केली.
राज्य सरकारने महात्मा फुले यांच्या फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी आणि त्याचबरोबर असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वीच २०० कोटी निधी मंजूर केला आहे. यांपैकी १०० कोटी वितरित देखील करण्यात आलेले आहेत. असे असताना देखील या कामाला अद्यापपर्यंत गती मिळालेली नसून हे काम सुरू झाले नाही. या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काही अनाधिकृत बांधकाम देखील आहे, ते महानगरपालिकेने तात्काळ काढले पाहिजे, त्याचबरोबर एक वेळ निर्धारित करून साधारण पंधरा दिवसांच्या आत या कामाला सुरुवात होईल, असं नियोजन अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, असं मत मांडलं.
या बैठकीमध्ये अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेला सूचना देताना,या कामाला दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता सर्व यंत्रणांनी समन्वय साधून यामध्ये तात्काळ भूसंपादनाचे काम हातात घेणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या वास्तूच्या जवळपास खासगी कार्यालय थाटण्याचा काही लोकांचा मानस आहे, अशी कार्यालये होता कामा नये, असे निर्देश देखील दिले.
पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्मारक विस्तारीकरणाच्या जागेमध्ये असलेले अनेक नागरिक हे स्थलांतरित करण्यासाठी तयार आहेत. त्या नागरिकांना प्राधान्याने आपण स्थलांतरित करणार आहोत, त्याचप्रमाणे काही नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देता येतील. या जागेची मोजणी देखील पूर्ण झाली आहे, अशी माहिती दिली.
मा. खासदार समीर भुजबळ यांनी देखील,या स्मारकाच्या जवळपास राहणाऱ्या व स्थलांतर करण्यास स्वेच्छेने तयार असलेल्या ५० नागरिकांना प्राधान्याने स्थलांतरित करून उर्वरित काम देखील महापालिकेने त्वरित सुरू करण्याची मागणी मांडली.
या बैठकीला आमदार हेमंत रासने,नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पुरातत्व विभागाचे महेंद्र साक्रे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रितेश गवळी, अविनाश चौरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.