नाशिक दिनकर गायकवाड पाथर्डी फाटा परिसरातील मुख्य रस्त्यालगत चिकन,मासे आणि इतर व्यावसायिकांनी अनधिकृतरित्या दुकान थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात आले.
मनपा अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई
राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान नवीन नाशिक, पश्चिम विभाग, पंचवटी विभाग व सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेषतः राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले, अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे, प्रविण बागूल, उमेश खैरे, सुमेश दिवे, निवृत्ती कापडणे, मेहुल दवे, वाहन चालक सुनील हिरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या कारवाईसाठी चार मोठी वाहने आणि एक जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. कारवाई-दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
