"अंधार दूर करून, जो मार्ग दाखवतो तो गुरू" भारतीय परंपरेत अशी गुरूची व्याख्या केली जाते.प्रत्येकाला आयुष्यात आई, वडील, बहीण,भाऊ वा मित्र अशा रूपात गूरू भेटत असतो.मला मात्र वरील सर्व रूपं माझे गुरू सुप्रसिद्ध चित्रकार, व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत यांच्यात भेटली.
गुरू मला कधी वडिलांप्रमाणे धाकात ठेवतात तर कधी आईप्रमाणे पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात.कधी भावाप्रमाणे भासतात तर कधी मित्राप्रमाणे गळ्यात हात घालतात... वयाच्या सातव्या वर्षांपासून मी गुरूंना शेपटीसारखा चिटकलोय. त्यांच्यातील काम करण्याची
उर्जा,त्यांची विनोद बुद्धी, समजावून सांगण्याची पद्धत, दुसऱ्यांना समजून घेण्याची कला, दुसऱ्याचे ऐकूण घेण्याचा साधेपणा, संकटप्रसंगी खंबीरपणे उभे राहण्याची धमक, त्यांचा निगर्वी मितभाषी स्वभाव, अजात शत्रु्त्व, कमालीची नम्रता, वटवृक्षाप्रमाणे
वाढलेल्या त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रती असलेली त्यांच्या आत्मियता आणि माझ्याप्रती असलेली आपुलकी या आणि अशा अनेक गुणांमुळे सुरूवातीपासूनच मी प्रंचड प्रभावित होतो. त्यातील सर्वच गुण मला आत्मसात करता आले नाही हे माझे दुर्दैव... मात्र तरीही गुरूंनी मला जे दिले ते जगातल्या कुठल्याच गुरूंनी त्यांच्या शिष्याला दिले नसेल असे मला वाटते.
गुरूंचा मुलगा सत्यजितही अतिशय सुंदर चित्र रेखाटतो. काही वर्षांपूर्वी त्याने माझे व गुरूंचे तैलचित्र साकारले. बारकावे पाहून हे चित्र मोठ्या अनुभवी चित्रकाराने रेखाटल्यासारखे वाटेल. मात्र वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सत्यजितने रेखाटलेले हे चित्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
आज गुरूपौर्निमेनिमित्त हे चित्र शेअर करीत आहे.
आजच्या या दिनी गुरूंना त्रिवार वंदन! आपल्या गुरुची मुर्ती आपल्या मनात कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नाही.
चित्रकार,पत्रकार रवि भागवत
श्रीरामपूर