शारदानगर परिसर भक्तीरसात न्हालं;बालगोपालांच्या विठ्ठलभक्तीने साऱ्यांचं लक्ष वेधलं.
श्रीरामपूर दिपक कदम येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री. शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम,सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
"देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे,"असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, पखवाजाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.
यावेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली.
शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल", "माऊली माऊली" अशा भक्तीगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली.विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तीभाव,टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
