नाशिक दिनकर गायकवाड शहरातील द्वारका चौकातील मध्यभागी मोठ्या प्रमाणावर पावसामुळे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या पावसामुळे दुरुस्ती करणे अशक्य झाल्याने नाशिककर खड्यातुनच मार्ग काढीत असल्याने छोटे-मोठे अपघातही वाढू लागले होते.
या संदर्भात मंत्री लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घातल्याने व काहीशी उघडीप झाल्याने द्वारका परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. द्वारका परिसरच नव्हे तर शहरातील काही प्रमुख मार्गावर देखील आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने नाशिक महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सुमारे ५० कर्मचाऱ्यांची विशेष पथक यामध्ये कार्यरत असून, आधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने खड्डे बुजवले जात आहेत.
काल सकाळपासूनच हे काम वेगाने सुरू असून वाहतूक सुरळीत राहील, यासाठी देखील मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकात अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. नाशिककरांना सतत झळा सहन कराव्या लागलेल्या या ठिकाणी अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि नाशिक मध्यच्या आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी सातत्याने या समस्येवर लक्ष केंद्रित केल्याने द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागला आहे. येथील वाहतूक बेट हटविल्यानंतर त्वरीत अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाल्याने द्वारका चौकाने मोकळा श्वास घेतला असून, वाहनांची वहनक्षमता पूर्वीच्या तुलनेत अधिक झाली आहे. तर वाहतूक बेट हटवल्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.
शिवाय वाहतूक पोलिसांची संख्याही वाढविण्यात आली आहे. परिणामी गर्दीच्या वेळेतही वाहनांची गती सुरळीत झाली आहे.पोलिसांची सततची उपस्थिती आणि कार्यक्षम नियंत्रणामुळे चोख वाहतूक व्यवस्थापन दिसून येत आहे. मात्र वाहतूक बेट काढल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या खड्ड्यांची मालिका निर्माण झाली होती. तसेच मध्यभागी साचणारे पाणीही छोट्या-मोठ्या वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरले होते.
मुसळधार पावसामुळे दुरुस्तीस विलंब झाला. मात्र आता पाऊस कमी झाल्याने नाशिक महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीचा प्रयत्न सुरु केला असून खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. गेली अनेक वर्षे द्वारका चौक हा प्रवाशांची डोकेदुखी ठरली होती.
मंत्री छगन भुजबळ, गिरीष महाजन व आ. फरांदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन विशेष लक्ष दिल्याने हा बदल घडला आहे, त्याबद्दल आणि मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेले या भागातील अतिक्रमण हटवणे आणि सिग्नल कार्यान्वित होणे ही दोन महत्वाची पावले होती.आता प्रशासनाने येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने नाशिककर समाधान व्यक्त करत आहेत. ही मोहीम शहरातील अन्य रस्त्यांवरही वेगाने करावी, अशी मागणी देखील होत आहे.