वाहतुकीचे अनेक समस्यांचे निवारण करत आराखडा सक्षम करण्यासाठी जनतेचे मते विचारात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत नागपूर मध्ये रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असल्या तरी त्या कमी पडत आहेत.वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पायी चालणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित फुटपाथसह सर्व भागांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांची निर्मिती,अपुऱ्या स्थितीतील चौकांचे विस्तारीकरण,महानगरात धावणाऱ्या बसेसचे थांबे, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसचे मार्ग, मेट्रो स्टेशन पासून त्याला बसेसची कनेक्टीव्हिटी आदी मुलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे.सुमारे २५ हजार ५६७ कोटी रूपयांच्या प्रारूप आरखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी जनतेचीही मते याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागपूर महानगराच्या सर्वसमावेशक गतिशिलता आराखडा बाबतच्या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर,संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रस्ते अपुरे व वाहनांची संख्या अधिक अशा स्थितीत नागपूर आहे.प्रत्येक दिशेला नवनवीन महानगर होत आहेत.मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार येत आहेत.स्वाभाविकच याचा ताण हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत आल्याने नवीन आराखड्यानुसार कामे लवकर व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणेने भर द्यावा,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.