नाशिक दिनकर गायकवाड नवीन नाशिक येथील गणेश चौकातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ६८ च्या जागेवर १०० खाटांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झाला आहे. या जागेवर रुग्णालय उभारण्यासाठी सिडको प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिला आहे. शाळेच्या जागेचा वापर बदलासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
सिडकोतील नागरिकांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आमदार सीमा हिरे यांनी गणेश चौकातील ५ मनपा शाळेच्या जागेवर रूग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, गणेश चौक येथील मनपाची शाळा बंद असून, या जागेवर १०० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. सिडको प्रशासकांनी या जागेसाठी
सिडकोची कोणतीही हरकत नसल्याचे कळविले आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयास शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी संबंधित विभागामार्फत शासनाकडे मनुष्यबळ उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल.
गणेश चौकातील हायस्कुल व क्रीडांगण या दोन्हींचे एकत्रित क्षेत्र १०८२३ चौ.मी. इतके असून या जागेचा अस्तित्वातील वापर शाळा व मैदानासाठी करण्यात येत आहे. या जागेचा वापर हा रूग्णालयासाठी करायचा झाल्यास नगर रचना अधिनियमान्वये किरकोळ गौण फेरबदलाची कार्यवाही करावी लागेल, त्यासाठी महासभेची मान्यता गरजेची आहे. त्यामुळे नगररचना विभागाने तसा प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे.
