नाशिक दिनकर गायकवाड येथील कलानगर परिसरातील थोरात पेट्रोल पंपाच्या मागे असलेले एक जुने व मोठे गुलमोराचे झाड जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. या दुर्घटनेत इमारतीचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसराचा वीजपुरवठा पूर्णत खंडित झाला.
झाड कोसळल्याने 'कोमल गुड्स' या इमारतीतील एका फ्लॅटच्या खिडकीच्या काचा फुटल्या.त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांचे पुढील भाग आणि काचा नुकसानग्रस्त झाल्या. या घटनेमुळे संबंधित वाहनधारकांना नुकसान सहन करावे लागत आहे.
झाडाच्या धक्क्याने महावितरण कंपनीच्या मुख्य विज पुरवठा करणारी वायर तुटली असून त्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, स्थानिक रहिवाशांना रात्री अंधारात राहावे लागले. घटनेनंतर मा. नगरसेविका डॉ.सीमा ताजणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
त्यांनी महापालिका व महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधत सांगितले की, "या परिसरातील जुनाट व धोकादायक झाडांची तातडीने छाटणी व देखभाल करण्याची गरज आहे. तसेच नागरिकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा. यावेळी रहिवासी मीरा तुंगार, मंगल ठाकरे, शारदा आहेर, वृंदा मजुमदार, रजनी चौगुले, ज्योती मुजुमदार, राधिका पोळे, राजेंद्र ताजने, रमेश पाळदे, भाऊसाहेब तुंगार, विलास पेखळे, अनिल नागे, गोपाल कृष्णा आर्दीसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
