नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी,त्र्यंबकेश्वरसह राज्यभरात, देशात आणि परदेशातीलही समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांचे उपस्थितीत हा दिवसभराचा मंगलमय सोहळा झाला.
विशेषतःदिंडोरी येथे भल्या पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत सेवेकऱ्यांनी, भाविकांनी गर्दी केली.दिंडोरी केंद्रात दिवसभरात दीड लाखापेक्षा अधिक लोकांनी श्री. स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींच्या दर्शनाचा लाभघेतला. यावेळी गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केले.
७ जुलै पासूनच सेवा मार्गाच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.आषाढी एकादशीपासून गेल्या पाच दिवसांत देशभरातून आलेल्या प्रमुख हजारो सक्रिय सेवेकऱ्यांना गुरुमाऊलींनी मार्गदर्शन करून पुढील कार्याबाबत व घरोघरी सेवाकार्य पोहोचविण्यासाठी काय दिशा असावी, याबाबत मार्गदर्शन केले.
सकाळी सहा वाजता गुरुमाऊली दिंडोरी केंद्रात गुरूपादुका पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षडशोपचार पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवद्य आरतीची सेवा सर्व सेवेकऱ्यांनी रुजू केली.गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा,
उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश,तेलंगणा, तामिळनाडू, केरळ यासह अनेक राज्यात आणि नेपाळ,अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप,ऑस्ट्रेलिया,दुबई, ओमान मधील समर्थ केंद्रात सुद्धा मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.सेवामार्गाचे जगभरातील कार्य आणि
भविष्यातील नियोजन याबाबत विस्तृत चर्चा करून समर्थसेवा घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र झटायचे आहे, असे आवाहन गुरु माऊलींनी केले.शहीद जवान,आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील,गरीब मुला-मुलींचे विवाह सेवामार्गाच्या वतीने मोफत लावली जाणार असल्याची आणि सद्गुरू मोरे दादा हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत रुग्णसेवा देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही गुरुमाऊलींनी केली. शिखरे गुरुजी यांनी शांती मंत्र पठण केले तर मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.