नाशिक दिनकर गायकवाड एक गठ्ठा स्वाक्षऱ्यांची परवानगी नसल्याने दाखले देतांना कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत आहे. यामुळे दाखले प्रलंबित राहतात. सध्या सुमारे तीन हजार दाखले प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने शासनाकडे एकगठ्ठा सायनिंगचा प्रस्ताव पाठविला असून शासनाने मंजुरी दिल्यास दाखले देण्याची प्रक्रिया त्वरेने पार पाडता येईल,असे मत नाशिकच्या प्रांत अधिकारी शुभांगी भारदे यांनी व्यक्त केले.
प्रदेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने सेतू सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करण्यात येतात; मात्र एकगठ्ठा सही करण्याची परवानगी नसल्याने प्रांत
कार्यालयात मॅन्युअली प्रक्रिया पार पडत असून, दिवसाला फक्त तीनशे दाखले मार्गी लागत आहेत. त्यामुळे सध्या नाशिक प्रांत कार्यालयात तीन हजार दाखले प्रलंबित आहेत. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक प्रक्रियेमुळे राज्यात अनेक ठिकाणी ही अडचण निर्माण होत असल्याने दाखले प्रलंबित आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासनाकडे एकगठ्ठा सही करण्याची परवानगी द्यावी,असा प्रस्ताव पाठविला आहे. सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.अकरावीचे कॅप राऊंड सुरू आहेत. तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नॉन क्रिमीलेअर,जातीचा दाखला, डोमेसाइल,नॅशनॅलिटी, उत्पन्नाचा दाखला, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जातपडताळणी प्रमाणपत्र हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरू आहे. मात्र दाखला मिळण्यास उशीर
होत असल्याने विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सॉफ्टवेअर मधील तांत्रिक प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याने दिवसाला तीनशे दाखल्यांचे वितरण केले जात असल्याचे प्रांत विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, दाखले वितरण करणारे जे सॉफ्टवेअर आहे यात एकगठ्ठा सायंनिग होत नाही, त्यामुळे प्रत्येक दाखल्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक कागदपत्राची तपासणी केल्यानंतरच अंतिम दाखला वितरण करण्यात येत आहे. प्रत्येक दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी किमान ५ मिनिटे लागत आहे. त्यामुळे दिवसाला फक्त तीनशे दाखल्यांचे वितरण होत आहे. अनेक पालकांना चकरा माराव्या लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे.