अहिल्यानगर विशाल वाकचौरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून केडगाव परिसरात परवानगी शिवाय धार्मिक कार्यक्रम घेतल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार येथील अमरधाम रोड वरील मोसंबी बागेजवळ उघडकीस आला.
पोलीस शिपाई अनुप शेखर झाडबुके (पो. कॉ. ४९८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कोतवाली पोलिस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी आशिष अभय सत्राळकर (रा. प्रेमदान चौक, सावेडी) आणि गणेश लाहवरे (रा. एकविरा चौक,अहिल्यानगर) या दोन व्यक्तींनी अंदाजे ५० ते ६० स्त्री-पुरुषांना गोळा करून, लाऊड स्पीकरच्या साहाय्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे आढळून आले.
सदर घटनेबाबत जेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी १४ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचेही त्यांनी उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आशिष सत्राळकर व गणेश लाहवरे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(२)(३)/२३५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.