आमदार संजय केळकर यांची माहिती..
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क वृत्तपत्रांतील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची तरतूद असली तरी ठाणे - मुंबईसह राज्यभरातील हजारो डिजिटल माध्यमातील पत्रकारांना ही सुविधा नसल्याने त्यांना अनेक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. या पत्रकारांना देखील अधिस्वीकृती पत्रिका मिळावी यासाठी आमदार संजय केळकर यांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते.
वृत्तपत्रातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना वैद्यकीय मदत, परवडणारी घरे,निवृत्ती वेतन योजना आरोग्य विमा,अशा अनेक सवलती सुविधांचा लाभ मिळतो.त्याचवेळी ठाणे-मुंबईसह राज्यभरात हजारो पत्रकार डिजिटल माध्यमात पत्रकारिता करत असून त्यांना अधिस्वीकृती पत्रिकेअभावी या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत डिजिटल पत्रकारांनी त्यांच्या व्यथा आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या पत्रकारांना देखील अधिस्वीकृती पत्रिका मिळावी अशी मागणी केली होती. याबाबत श्री.फडणवीस यांनी श्री.केळकर यांना या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पत्राद्वारे सांगितले.
अधिस्वीकृती नियम २००७ अन्वये डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची तरतूद नाही.या नियमावलीमध्ये वेळोवेळी झालेले बदल लक्षात घेऊन तिच्यात आवश्यक सुधारणा करण्याची आणि ती अद्ययावत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ही सुधारणा करताना आपल्या मागणीनुसार डिजिटल माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल,असे श्री.फडणवीस यांनी नुकतेच श्री. केळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
डिजिटल माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळाल्यास ठाणे, मुंबईसह राज्यातील हजारो पत्रकारांना दिलासा मिळणार आहे. याबाबत करत असलेल्या पाठपुरावसाठी ठाणे-मुंबईतील डिजिटल पत्रकारांनी श्री.केळकर यांचे आभार मानले आहेत.