अन्यथा २८ ऑगस्टला सर्व पक्षांच्या वतीने निदर्शने
श्रीरामपूर दिपक कदम वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला बेलापूर ठाण्यावर दोन मिनिटांचा थांबा मिळावा,साई सुपरफास्ट ट्रेन रोज चालू करावी,तसेच मैसूर-वाराणसी एक्सप्रेसलाही बेलापूरला थांबा द्यावा, या मागण्यांसाठी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बेलापूर रेल्वे स्टेशनवर सर्वपक्षीयांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली.
या मागण्यांबाबत त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर रेल्वे ठाण्याचे प्रबंधक एम.पी. पांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मा.आमदार भाऊसाहेब कांबळे,भाजपचे युवक तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, भैय्या भिसे शांतीलाल पोरवाल, बाबासाहेब पवार, मच्छिंद्र साळुंखे,राहुल पांढरे,,बन्सी फेरवानी,बाळासाहेब चांडोळे गुरुनानक मार्केटचे अध्यक्ष राजू बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात सांगण्यात आले की, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले, आणि त्या ट्रेनला अहिल्यानगर, कोपरगाव, जळगाव, अंजनी, नागपूर आणि पुणे येथे थांबा देण्यात आला आहे. मात्र बेलापूर स्टेशनचा समावेश करण्यात आला नाही, ही बाब श्रीरामपूरकरांसाठी अन्यायकारक आहे.
निवेदनात असा दावा करण्यात आला की, देशभरातील १३० वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनने केवळ दोन दिवसांत कमाईचा उच्चांक गाठला, त्यामुळे ती ट्रेन बेलापूरमध्ये थांबवणं अत्यंत आवश्यक आहे.
त्याचबरोबर, साई सुपरफास्ट ट्रेन सध्या आठवड्यातून फक्त चार दिवस चालवली जाते, ती दररोज चालवावी, अशी मागणीही करण्यात आली. बेलापूरहून या ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी असतात. तसेच मैसूर-वाराणसी ट्रेन कोपरगावला एक ते दीड तास थांबते, पण बेलापूरला थांबत नाही, हे देखील श्रीरामपूरकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला गेला.
या मागण्यांची दखल घेतली नाही, तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही सर्व पक्षांच्या वतीने त्रिभुवन यांनी दिला आहे.
