आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक ते मांची फाटा हा अवघा ७ किमीचा रस्ता,पण आज मात्र अक्षरशःखड्ड्यात गेल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी संतप्त भावना व्यक्त करत आहेत तर उगीच या रस्त्यावरुन चाललो असे उद्विग्न होऊन बोलत आहे.संगमनेरकडे जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग असला तरी रस्त्यावरचे प्रचंड खड्डे,उखडलेले डांबर आणि चिखल यामुळे नागरिकांचा, शेतकऱ्यांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास मृत्यूचा सापळा ठरत आहे.रस्त्यावरुन गर्भवती महिला आणि वृद्धाचा प्रवास जीवघेणा ठरताना दिसतोय.या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आश्वी बुद्रुक गावची तब्बल ३५ टक्के लोकसंख्या वास्तव्यास असून रोज पंचक्रोशीतील हजारो लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
या मार्गावरच आश्वी बुद्रुक पासून अवघ्या ३ कि.मी.वर असलेले मांची हिल शैक्षणिक संकुल विशेष महत्त्वाचे आहे.येथे सुमारे २ हजार विद्यार्थी आणि २०० शिक्षक रोज शिक्षणासाठी ये-जा करतात.रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे त्यांचा रोजचा प्रवास धोकादायक ठरतानाचे
चित्र दैनंदिन बघताना मिळते याच रस्त्यावर असलेला प्रवरा डाव्या कालव्या वरील जुना पूल देखील शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. त्याचे सर्व स्ट्रक्चर उखडले असून तो धोकादायक बनवताना दिसतोय पुलावरील लोखंडी कठडे गळून पडले असून पावसाळ्यात पाट कालवा पाण्याने पूर्ण भरल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतना दिसतोय.
यावेळी ग्रामस्थांनी रोष व्यक्त करुन सांगितले की काळाच्या ओघात जर “हा पूल तुटला तर शेकडो जीव गमवावे लागतील. मग जबाबदार कोण?”असा संतप्त सवाल करत ते पुढे म्हणाले की फक्त एवढेच नव्हे तर मांची हिल व मांची गावाला जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलालाही सुरक्षेची कोणतीही सोय नाही.
दोन वर्षांपूर्वी हा पूल बांधला असला तरी आजतागायत साधी कठडे वा लोखंडी जाळीही बसवली नाही. म्हणजे पुलाची अर्धवट अवस्था येथील प्रवाशांच्या जीवावर बेतणारी आहे.ग्रामस्थांच्या मते, “पूल आहे पण सुरक्षाच नाही,थेट जिवावर बेतणारी परिस्थिती असल्याने येथील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय.
या रस्त्याची आणि पुलांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की प्रशासनाने आता तरी जागे होणे अत्यावश्यक आहे.रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण आणि प्रवरा कालव्यावर नवीन मजबूत पूल उभारणे आणि ओढ्यावरील पुलाची सुरक्षात्मक दुरुस्ती या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.अन्यथा मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन हलणार नाही आणि त्याची जबाबदारी कोण?घेणार हा प्रश्न येथील ग्रामस्थ सातत्याने उपस्थित करत आहेत.
आज आश्वी बुद्रुक ते मांची फाटा हा रस्ता आणि त्यावरील पूल ग्रामस्थांसाठी जीवाचा प्रश्न बनला आहे. शेतकऱ्यांचे जीवन आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व गोष्टी या रस्त्याशी निगडीत आहेत.
प्रशासनाने जर त्वरित पावले उचलली नाहीत,तर उद्या एखादी भीषण दुर्घटना घडेल आणि त्यावेळी फक्त दुःख व्यक्त करण्यापलीकडे शासनाच्या हाती काहीही उरणार नाही.म्हणूनच आजच उपाययोजना कराव्यात कारण गावकऱ्यांचा एकच सवाल आहे – “अपघातानंतर जबाबदारी कोण घेणार?”