देशातील व विशेषतःमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास उज्वल आहे.सामाजिक सुधारणांचा स्त्रोत जिथे सुरू झाला आणि तिथे महाराष्ट्र शिव-शाहू -फुले -आंबेडकर यांनी ज्या गतीने पुढे नेला त्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. अभिमानास्पद उत्तम भविष्यासाठी पोषक आणि चिकित्सक वातावरण महाराष्ट्र भुमीने नेहमी दिले आहे,पण सद्य राजकारणात महाराष्ट्राला नेहमी डावलले जाते आणि अभ्यासू,तत्वज्ञानी उमेदवारांना महाराष्ट्रातील,देशातील खरे शासक संसदेत पोहचू देत नाही आजही मतदारांना आपल्या देशातील खऱ्या शासकांचा पत्ता देखील लागलेला दिसत नाही.पुर्वी मतपत्रिकेत घोळ होत आता ई.व्हि.एम.मध्ये छेडछाड करुन निकालच बदलले जाऊ शकतात.
लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्रवेत्ते,लेखक,समाजशास्त्र आणि इतर कित्येक लोकांनी आपापल्यापरीने केलेली आहे वॉल्टर बेगहोट याने इंग्लिश संविधानावर (English Constitution) एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे,त्यात लोकशाहीचे सुस्पष्ट चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.चर्चेवर आधारलेली शासनसंस्था म्हणजे लोकशाही अशी त्यांने व्याख्या केली आहे.त्याचप्रमाणे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही होय अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची व्याख्या केली आहे. निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि हाच १९५२ ते २०१९ चा उत्सव लेखक हिरालाल पगडाल यांनी आपल्या 'इलेक्शन बिलेक्शन' ह्या पहिल्या वहिल्या पुस्तकात संक्षिप्त पण माहितीपुर्ण मांडला आहे.
लेखक हिरालाल पगडाल हे शिक्षक नेते आहेत त्यांची भाषा साधी सोपी आणि लालित्यपूर्ण आहे ते बोली भाषेत निवडणूकांचे विश्लेषण करतात कोरोना काळात,
लॉकडाऊन मध्ये असतांना त्यांनी सोशल मीडियावर हि लेखमाला लिहिली.लॉकडाऊनच्या काळात घरात सगळेजण अडकून पडले होते अशाच त्यांनी हे लेख लिहून खुप मोलाचे काम केले.तसे लॉकडाऊन मध्ये अनेक लेखकांनी लिखाण केले तर काही विचारवंतांनी कोरोना कसे षड्यंत्र आहे याचे पोस्टमार्टम करत युरोपातील इल्लुमिनाटी सारख्या गुप्त पंथियाकडून न्यु वर्ल्ड ऑर्डरच्या(जगावर एक हाती सत्ता) नावाखाली हा कोरोना भारतासह अनेक देशात म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे जे जे देश सदस्य आहे त्या त्या देशात कोरोनाने अनेकांचे प्राण घेतले महाराष्ट्रातील असा एकही माणूस नसेल ज्यांनी कोरोनात आपले जवळचे नातेवाईक गमावले नसेल आता युरोपात देखील कोरोना विरोधी चळवळ सुरू झाली आहे खरे तर हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे असो!
इलेक्शन बिलेक्शन असे गंमतीदार शिर्षक असलेल्या या पुस्तकात १९५२ ते २०१९ या सुमारे सत्तर वर्षांचा निवडणूकांचा लेखाजोखा मांडताना लेखक हिरालाल पगडाल यांनी सतरा लोकसभा व पंधरा विधानसभा निवडणूका केंद्रबिंदु मानून हे पुस्तक लिहिले आहे पुस्तकात गल्ली ते दिल्ली पर्यतचे अनेक संदर्भ आहेत पुस्तकात एकूण १३ लेख,देश,राज्य आणि जिल्हा पातळीवरील सर्व विजयी आणि पराभुत सदस्याचे नावे, निवडणूक साल योग्य ठिकाणी त्याच काळातील छायाचित्र असल्यामुळे लिखाणात जिवंतपणा वाटतो.केवळ निवडणूकीतील उमेदवारांची नावे,मतदानाची आकडेवारी न देता त्या त्या निवडणूकीची पार्श्वभूमी विषद करताना लेखकाने जे ऐकले,वाचले आणि बघितले त्या सगळ्याचा सार या पुस्तकात दिसून येतो निवडणूकीच्या राजकारणात अगदी छोटे-छोटे मुद्दे कसे परिणामकारक ठरतात हे वाचतांना नकळतपणे भारतीय मतदाराचे मानसशास्त्रही उलगडत जाते.महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकांची संक्षिप्त माहिती सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा सरळ साध्या सोप्या भाषेत लेखकाने लिहिले आहे.
तरुण वाचकांना आणीबाणी बद्दल समजेल अशा पद्धतीने लेखक हिरालाल पगडाल यांनी पुस्तकात संदर्भ मांडले आहेत त्यामुळेच हे पुस्तक विद्यार्थी,शिक्षक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, निवडणूक विश्लेषक अभ्यासक या सर्वानाच उपयुक्त ठरेल याबद्दल शंकाच नाही.देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील निवडणूकांचे यथार्थ मांडणी करतांना लेखकाने योग्य तेच मांडले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे नात्यागोत्याचे राजकारण आहे.इथल्या साखर सम्राटांनी शोषित वंचित आणि दुर्लक्षित समाजातील नेतृत्व जन्मालाच येऊ दिले नाही.
जयहिंद लोकचळवळ तर्फे प्रकाशित हे लेखक हिरालाल पगडाल यांचे पहिलेच पुस्तक आहे यानिमित्तानेच जयहिंद लोकचळवळीने प्रकाशन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे सुनिल मादास यांनी अगदी दर्जेदार मुखपृष्ठ केले आहे तर पृष्ठाची संख्या १८४ आहे. प्रत्येकाने आपल्या ग्रंथालयात संग्रहही ठेवावे असे हे इलेक्शन बिलेक्शन पुस्तक मला वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर मिळाले काल परवा ते प्राप्त होताच वाचून काढले.हे पुस्तक खुपच अप्रतिम असुन वाचकांनी हे वाचलेच पाहिजे असे माझे मत निर्माण झाले.
भारतीय लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या सुज्ञ मतदारांना लेखकाने हे पुस्तक अर्पण केले आहे तर पद्मश्री सन्मानप्राप्त बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे तर प्रकाशक मा. आ.डॉ.सुधीर तांबे या पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना या पुस्तकाचे लेखक हिरालाल पगडाल यांचा व्यक्ती परिचय करून दिला आहे.
पुस्तक परिचय-महेश भा.भोसले
लेखक-हिरालाल पगडाल
प्रकाशक-जयहिंद लोकचळवळ
किंमत-२३०/-
पृष्ठ-१८४