नाशिक दिनकर गायकवाड एका कंपनीचे डिझाईन कॉपी करून हुबेहूब पट्ट्या तयार करून मूळ कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की आरोपी पंकज भानुप्रताप त्रिपाठी (वय ४५, रा. काठे गल्ली, द्वारका) याने सेंट गोबेन इंडिया प्रा.लि.या कंपनीचे डिझाईन कॉपी करून एंट गोबेन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या व नावाने हुबेहूब दिसणाऱ्या पट्टया तयार केल्या.
हा सर्व प्रकार दि. २२ ऑगस्ट रोजी पँथर फेम सिलिंग हाऊस, छत्रपती संभाजीनगर रोड,कपालेश्वरनगर येथे घडला. सेंट गोबेन कंपनीच्या नावाची नक्कल केल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी (वय ४३, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात त्रिपाठी याच्याविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून ४२ हजार रुपये किमतीच्या एंट गोबेन इंडिया प्रा.लि.या कंपनीच्या आयर्न धातूच्या बनावट पट्ट्या, ३० हजार रुपये किमतीच्या सेंट गोबेन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट पट्ट्या, २० हजार रुपये किमती पॅरामीटर पट्टी बनविण्याचे दोन लोखंडी डाय, २० हजार रुपये किमतीचे बॉटम पट्टी बनविण्याचे दोन लोखंडी डाय असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार सोनार करीत आहेत.