नाशिक दिनकर गायकवाड घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना वावरेनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी भीमाबाई रोहिदास मुसळे (रा. विठ्ठलनगर, वावरेनगर, अंबड लिंक रोड) या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी शोकेसची काच फोडून त्यातील लॉकरमध्ये असलेली १ लाख २० हजार रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६० हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ लाख २८ हजार रुपये किमतीची ३७ ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टी व साडेदहा हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून भरदुपारी चोरून नेला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार महाजन करीत आहेत.