-पुन्हा एकदा नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल आणि रिंगरोडसाठी आग्रही
नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन नाशिक मधील विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये सुरू असलेली व प्रस्तावित असलेली विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव नितीन गडकरी यांना करून दिली. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शहराच्या रस्ते,महामार्ग, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थापन यामध्ये दर्जात्मक बदल होणे हे केवळ गरजेचे नाही, तर अनिवार्य असल्याचे स्पष्टपणे मांडले.
बैठकी दरम्यान आपण नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपूल प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढता प्रश्न लक्षात घेता हा पूल तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच, नाशिकसाठी प्रस्तावित असलेला उन्नत रिंग रोड हा केवळ शहराच्या परिघावरील वाहतूक विस्कळीत होण्यापासून थांबवणार नाही, तर शहराचा बहुआयामी विकासही गतीमान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थ काळात होणारी अफाट गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक व आपत्कालीन व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेता, हा रिंग रोड नाशिकसाठी जीवनरेषा ठरू शकतो, असे ते म्हणाले.
या चर्चेत नाशिक-पुणे औद्योगिक महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांच्याही दुरुस्ती, आधुनिकीकरण व विस्ताराच्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः औद्योगिक महामार्गामुळे नाशिक आणि पुण्याच्या दरम्यानचा प्रवास वेळ वाचवणारा आणि सुरक्षित ठरणार असून, या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील औद्योगिक व व्यापारिक व्यवहारांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नाशिक-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे दोन महत्त्वाच्या शहरे अधिक वेगाने व सुरक्षित पद्धतीने जोडली जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सर्व प्रकल्पांना तातडीने मंजुरी, निधी वितरण व कामाला गती देण्यासाठी विशेष लक्ष देण्याची विनंती केली. त्यावर नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागांमार्फत तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू होईल यासाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिले.