आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील रहिमपुर येथील अरुणाबाई रामनाथ शिंदे (वय - ६८) या वृध्द महिलेवर मंगळवारी रात्री बिबट्याने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यामुळे या वृध्द महिलेला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर लोकवस्ती घुसुन बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.स्थानिकांकडून याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे अरुणाबाई शिंदे ही वृध्द महिला घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या होत्या.तर त्याचा मुलगा घरात झोपलेला होता. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात थेट गावठाणात आलेल्या बिबट्याने सावज समजून ओट्यावर झोपलेल्या अरुणाबाई शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.यामध्ये त्यांच्या चेहऱ्यासह बोटाना देखील गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान वृध्द महिलेचा आरडाओरडा ऐकून कुटुंबियासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने महिलेला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि नंतर नगर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या महिलेच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून असून वृध्द महिलेची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
