आश्वी संजय गायकवाड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची दारे खुली करण्याच्या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील मालुंजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथे टॅब कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.इन्फोसिस कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून शाळेला ३ लाख रुपये किमतीचे टॅब प्राप्त झाले असून या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सरपंच मा. सुवर्णा संदीप घुगे होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रविण वाकचौरे यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते व मा.सरपंच संदीप घुगे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील मराठी शाळा शहरी शाळांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असून,विनाखर्च डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देत आहेत,असे स्पष्ट करून मराठी शाळांचा अभिमान व्यक्त केला.गावाकडून शाळेला हवी ती मदत मिळविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आश्वी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले.प्रसंगी बोलताना बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले किरण घुगे यांनी, “मी गावाशी जोडलेलो आहे.माझ्या मातीतल्या शाळेला जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा मी सदैव पुढाकार घेईन”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अहिल्यानगर लोकल फंडचे सहाय्यक संचालक रमेश कासार यांनी विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले.आपल्या मनोगतात त्यांनी ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील मराठी शाळांनी उभारलेल्या निधीचे व शाळांच्या शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच गावातील शाळेत शिकून उच्च पदावर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे लक्ष द्यावे,तिला सक्षम करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य सन्मान देण्यात आला.लक्ष्यवेध प्रज्ञाशोध तसेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या इयत्ता पहिलीचा आकाश कुटे व पाचव्या क्रमांकावर आलेल्या इयत्ता दुसरीचा आदर्श खरात या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.यावेळी विद्यार्थिनी दिव्या अवचिते व प्रांजल भाबड यांनी आपली मनोगते व्यक्त करून शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेच्या उपाध्यापिका सौ.प्रमिला जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनिल मुंतोडे यांनी केले.सोहळ्यास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप जोर्वेकर व सर्व सदस्य,पालक,शिक्षकवर्ग,गावातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हातात डिजिटल टॅब झळकताच वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. शाळेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.