छत्तीसगड सिटीलाईन न्यूज नेटवर्क सुकमा जिल्ह्यातील पाकेला पोर्टा केबिन निवासी विद्यालयात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे तब्बल ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा प्रकार उघड झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक धनंजय साहू याला अटक केली असून,न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरु होता. याआधी साहू अधीक्षक पदावर होता. मात्र,एका विद्यार्थ्याला मारहाण करून गंभीर दुखापत केल्यामुळे त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
त्यानंतर दुजल पटेल यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. या रागातूनच साहूने विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचे तपासात स्पष्ट झाले..घटना उघड झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली.जिल्हाधिकारी देवेश कुमार ध्रुव यांनी आरोपी शिक्षकाला निलंबित केले.
अधीक्षक दुजल पटेल यांनाही पदावरून हटवून समग्र शिक्षण विभागात हलवण्यात आले. तसेच सहाय्यक अधीक्षक गौतम कुमार ध्रुव यांचीही बदली करून त्यांना माध्यमिक शाळेत पाठवण्यात आले.
