मालेगाव प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात मालेगाव शहरात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवतीर्थ ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावरून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्य, आदिवासी पोशाख असलेली ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
या भव्य सोहळ्याला शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहून सहभागी झाले.आदिवासी समाजाच्या परंपरा,संस्कृती आणि इतिहासाबद्दल गौरवोद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी “आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांचा वारसा, कष्टाळूपणा आणि निसर्गाशी नाते ही आपली संपत्ती आहे. त्यांच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे” असे सांगितले.तसेच घरकुल योजने अंतर्गत ३,००० घरकुल आदिवासी बांधवांना मंजूर झाली आहेत.
मागील काळात आदिवासी बांधवांना वनजमिनी देण्याचे ७५% काम पूर्ण झाले आहे. याआधी पोटखरबा असल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना ७/१२ चा लाभ मिळत नव्हता, परंतु आता त्या वनपट्ट्याच्या जमिनी पोटखरबा काढून वैती करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना हक्काचे जमीनदस्तऐवज लाभतील.
याबाबत सविस्तर बोलताना ते पुढे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे खेळातील विशेष कौशल्य आहे, त्यांची नावे पदाधिकाऱ्यांनी निवडून दिल्यास त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने घेतली जाईल.जोपर्यंत आपली मुले शिकत नाहीत, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्वोत्परी करण्यात येईल.
आपल्या भाषणात भगवान वीर एकलव्य महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनाची आठवण करून दिली. “एकलव्य महाराज यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले, तरी त्यांनी आपल्या चिकाटीने जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनून दाखवले. आपल्या मालेगाव शहरात भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक व्हावे ही मागणी आम्ही सन्मानाने मान्य करतो, आणि असे स्मारक उभे करू की ज्याचा सर्वांना सन्मान व अभिमान वाटेल”, असे जाहीर केले.मिरवणुकीत सर्व पदाधिकारी, शहरातील तरुणाई आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.