जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क पारोळा येथील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाखो लाभार्थी शेतकऱ्याना ,दीर्घ प्रतीक्षेनंतर, केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा २० वा हप्ता जमा केला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून देशभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम जारी केली.यावेळी तहसिल कार्यालय पारोळा येथे आमदार मा.अमोल पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांचा खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली.
यासमयी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा भित्ती पत्रकाचे विमोचन, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचा वारसांना प्रत्येकी २ लक्ष रूपये अनुदान प्रमाणे पारोळा तालुक्यातील १२ अपघातग्रस्त शेतकरी वारसांना २४ लक्ष रूपये सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण, कृषि विभागाचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ५९ फळबाग केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना ११ लक्ष ३६ हजार रूपये अनुदानाचे वितरण आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील,बाजार समिती.उपसभापती दगडु पाटील, तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, सुरेश पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील यांचेसह महसुल व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, पत्रकार उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता अनेक कारणांमुळे खास आहे. ही योजना शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र शासन ६ हजार व राज्य शासन ६ हजार असे एकुण १२ हजार रुपयांची आर्थिक मदत सुनिश्चित करते. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागवण्यासाठी आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. केंद्र सरकारचे ६ हजार व राज्य सरकारचे ६ हजार असे प्रत्येकी एका शेतकऱ्याला १२ हजार रूपये प्रमाणे पारोळा तालुक्यातील २७ हजार शेतकरी बांधव, माता-भगिणींना ३२.५० कोटी रूपयांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता वर्ग करण्यात आला. यासह आज देखील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
के.वाय.सी.,मोबाईल नंबर,बँक खाते क्रमांकाचा समस्या यांमुळे आज देखील शेतकरी या योजनेपासुन वंचित आहेत. हे पात्र लाभार्थी अनेक वेळा माझ्याकडे देखील तक्रार घेवुन येतात,परंतु त्यांचा समस्येचे निराकरण होत नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपल्या स्तरावरून सुरू करून वंचित लाभार्थ्याला लाभ मिळवुन देण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार अमोल पाटील यांनी सुचित केले.