नाशिक दिनकर गायकवाड नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकास अटक केली आहे.
सिटीलिंक बस डेपो परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हेशोध पथकातील पोलीस शिपाई समाधान वाजे व विशाल कुंवर यांना मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जितेंद्र सपकाळे यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचा-यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला.
सापळा रचून कार्यवाही करताना, एक संशयित इसम दिसून आल्यानंतर त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव विकास प्रकाश परदेशी (वय २२, रा. रोकडोबावाडी, नाशिकरोड) असे सांगितले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि ५०० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन भामरे यांनी फिर्याद दिली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गु. र. नं. ३८४/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय टेमगर करत आहेत. नाशिक शहर पोलीस
दलाने नागरिकांना आवाहन केले आहे, की कुठेही अवैध शस्त्र वापर अथवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.
ही उल्लेखनीय कारवाई नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडे साब नाईकवाडे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, अजय देशमुख, विशाल कुंवर, समाधान वाजे, नितीन भामरे, नाना पानसरे यांनी केली.