येवला प्रतिनिधी नुकतेच येवला शहरात राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे यांनी केले होते.हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा भाग असून विणकर बांधवांच्या विकासासाठी महायुती सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून आगामी काळात त्यांना पेन्शन योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
१९०५ मधील स्वदेशी चळवळीच्या प्रेरणेतून आजही लाखो विणकर पारंपरिक वस्त्रनिर्मिती करतात. त्यांच्या कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करत, विणकरांना प्रति पुरुष १०,०००/- व प्रति महिला ₹१५,००० /-उत्सव भत्ता देण्यात येतो. पारंपरिक विणकरांचे सर्वेक्षण करून ओळखपत्रे दिली जात आहेत, अशी माहिती दिली.
येवला हे विणकर व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनले असून, २००४ मध्ये केवळ ३ पैठणी दुकाने असताना आज ४०० हून अधिक दुकाने आहेत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन नाशिक, साईबाबाबांची शिर्डी व पैठणीमुळे येवला पर्यटन त्रिकोण बनला आहे.
नुकतेच “पैठणी कलाकारी क्लस्टर, येवला” या १२.२३ कोटींच्या प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत आधुनिक यंत्रसामग्रीसह विविध सुविधा उपलब्ध होणार असून, रोजगार व विक्री वाढीस चालना मिळेल. हे सेंटर अनुसूचित जाती-जमाती व महिला उद्योजकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. चिखलदरा व बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क निर्मितीचाही प्रयत्न आहे. अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, मकरंद सोनवणे, दिलीप खोकले, प्रा.प्रभाकर झळके, प्रवीण पहिलवान, श्रीनिवास सोनी, नंदकुमार नागपुरे, सुभाष पाटोळे, दिलीप केंद्रे, सुहास भांबारे,अविनाश कुक्कर यांच्यासह विणकर बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.